ठाणे पोलिसांवर संजय राऊत यांचा संताप... ९० टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात

Foto
मुंबई : ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २७ दिवस उलटल्यानंतरही या कटाच्या सूत्रधारांना अटक न झाल्यामुळे राम पूर्णेकर यांनी काल (मंगळवारी, ता २७) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शुभ-दीप या निवासस्थानाबाहेर ठिय्या देण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असताना राम पूर्णेकर यांच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळले. तेव्हा पोलिसांनी रडणार्‍या  राम पूर्णेकर यांची कशीबशी समजूत काढत त्यांना रिक्षात कोंबून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ - दिप निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, या ठिय्या आंदोलनापूर्वीच वागळे इस्टेट पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले. कालच्या या प्रकरणानंतर आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना इशारा दिला आहे.

प्रत्येक एसआयटी महाराष्ट्रात नेमलेली ही बुळचट आहे. जेव्हा मी नाव पाहत होतो त्यातली, हे नकार घंटा वाजवणारे अधिकारी, हे जे बलकवडे आहेत, मला त्यांच्याशी व्यक्तिगत काही म्हणायचं नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाजवळ जो ड्रगचा कारखाना पकडला, तेव्हा ते तिथे ड्युटीवरती होते, काय केलं त्यांनी, कोणाला अटक केलं?  शेकडो कोटींचं ड्रग सापडतंय उपमुख्यमंत्र्यांच्या दारात, शेतात आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव त्यात येतं, साधं चौकशीला तरी बोलवलं आणि हे एसआयटीचे प्रमुख आहेत. हे एसआयटीचे प्रमुख आहेत ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये. ठाण्यातले एसआयटी कोणाच्या अंडर आहे?  ठाण्यातले ९०% अधिकारी, पोलीस अधिकारी हे पालकमंत्र्यांच्या पगारावर जातायत. सरकारचे नोकर नाहीयेत, ते पालकमंत्र्यांचे आहेत. जर ते नसते, तर पूर्णेकरांच्या खून प्रकरणामध्ये ऐव्हाना शिंदे पती-पत्नी हे तुरुंगात असते, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.

तुम्ही एक खून दडपण्याचा प्रयत्न करताय 
एक तरुण मुलगा ज्याने आपला बाप गमावलाय. हत्या झाली नजरेसमोर. तो मुलगा न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर जर जात असेल, तर पोलिसांना चोंबडेपणा करण्याची गरज काय? पोलिसांना हा चोंबडेपणा करण्याची गरज काय? त्या मुलाचा अधिकार आहे, की जो पालकमंत्री आहे ठाण्यात, त्याच्या घरासमोर जाऊन न्याय मागणं ही परंपरा आहे. पोलिसांना कुणी सांगितलं जाऊन त्याला अटक करा म्हणून, त्यांनी काय त्याच्या हातात शस्त्र होतं? तो त्यांच्या घरात घुसणार होता? तो काय त्यांना शिवीगाळ करत होता? तो दारू प्यायला होता? तो ज्यांच्याकडे न्याय मागायला चालला होता ना, पोलीस कोणाचे नोकर आहेत ठाण्यामधले? ठाण्यातल्या पोलिसांना जे आता आहेत, जे चाकरी करतायत पालकमंत्र्यांची, त्यांना याची फार मोठी किंमत चुककावी लागेल. तुम्ही सर्विसमध्ये असा अगर नसा, तुम्हाला किंमत चुकावी लागेल, तुम्ही एक खून दडपण्याचा प्रयत्न करताय आणि ज्यांनी खून केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय, हे अमानुष आणि बेकायदेशीर आहे, अशा शब्दांत राऊतांनी पोलिसांना इशारा दिला आहे. 
ठाण्यातले ९०% अधिकारी, पोलीस अधिकारी हे पालकमंत्र्यांच्या पगारावर जातायत